औरंगाबाद- औरंगाबादला उभारल्या जाणाऱ्या राज्यातील पहिल्या क्रीडा विद्यापीठा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा ही केवळ घोषणा किंवा' चुनावी जुमला' ठरू नये अशी अपेक्षा आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मिडियाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उदेशून व्यक्त केली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राज्यभरात भाजप सरकारतील सर्व मंत्र्यांकडून विविध घोषणांचा पाऊस सुरू आहे. त्यात पंतप्रधान नरेद्न्द्र मोदी असो व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो हे आपल्या भाषणातून अनेक घोषणा करत आहे. याची प्रचिती खुद्द सत्तेत भागीदार असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बीड मध्ये आली. त्यांनीही तिथे या भाजप सरकारच्या अनेक घोषनांचा उल्लेख केला. नुसत्या घोषणांच्या पावसाने मी हंडे भरणार नाही असे मत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले होते.
काय म्हणाले आमदार सतीश चव्हाण
मुख्यमंत्री महोदय, राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला उभारले जाणार असल्याची घोषणा काल आपण पुण्यात केलीत. त्याबद्दल आपले अभिनंदन. मागील चार वर्षांत मराठवाड्यासाठी आपण अनेक घोषणा केल्या मात्र त्यातील एकही घोषणा प्रत्यक्षात पूर्ण झालेली नाही. औरंगाबादसाठी मंजूर झालेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), भारतीय खेळ प्राधिकरणचे (साई) विभागीय केंद्र, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), जेरियाट्रिक्स सेंटर ऐनवेळी नागपूरला हलवण्यात आले. स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (एसपीए) चार वर्षांपासून कागदावरच आहे. त्यामुळे क्रीडा विद्यापीठाचे त्वरित भूमिपूजन व्हावे नाही तर आपली ही घोषणा फक्त'चुनावी जुमला' ठरू नये एवढीच माफक अपेक्षा…!